Annasaheb shinde biography of donald

राष्ट्रपतिपदाच्या १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी इंदिराजींच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत विजयी झालेल्या अण्णासाहेबांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार अशा बातम्या येत असतानाच इंदिराजींनी त्यांना कायम ठेवलं. पण, पंतप्रधानांचा रोष असताना काम करणं योग्य नाही, म्हणून मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं पत्र देऊन अण्णासाहेब श्रीरामपूरला परतले.

खासगी दौरा असल्याचं सांगून पोलिस, सरकारी वाहनं त्यांनी घेतली नाहीत, अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या.

तेवढ्यात अचानक दुसऱ्याच दिवशी अहमदनगरचे जिल्हाधिकारी अण्णासाहेबांना भेटण्यासाठी थेट श्रीरामपूरला आले. आपल्याला तातडीने दिल्लीला बोलावलं आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार अण्णासाहेब दिल्लीला पोहोचले, तर इंदिराजींनी त्यांना बोलावून घेऊन पत्र बाजूला ठेवल्याचं सांगितलं आणि मंत्री म्हणून तुम्ही पूर्ववत काम सुरू करावं, असं सांगितलं.

अण्णासाहेबांना याचं खूप आश्चर्य वाटलं. आपल्या देशाच्या हरितक्रांतीमध्ये ज्यांनी मोलाची भूमिका बजावली असे अण्णासाहेब शिंदे यांची ही हकिगत मी खुद्द रावसाहेब शिंदे यांच्याकडूनच श्रीरामपुरात ऐकली होती. अण्णासाहेबांनी देशाचे तब्बल १५ वर्षं कृषी राज्यमंत्री म्हणून फार मोठं योगदान दिलं होतं.

तसं पाहिलं तर हे शिंदे कुटुंब नाशिक जिल्ह्यातल्या ठाणगाव पाडळीचं.

डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं हे गाव. शेतकरी कुटुंब, घरची शेती, गुरंढोरं, शेण काढणं, खळ्यातील कामापासून शेतीत पडतील ती सर्व कामं करणारे अण्णासाहेब पुढं देशाचे शेतीमंत्री झाले. स्वातंत्र्यलढा, शेतकरी-कामगारांचा लढा यांत भाग घेणारे अण्णासाहेब पुढं प्रवरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष झाले. धनंजयराव गाडगीळ आणि विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासमवेत त्यांनी काम केलं.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष, बाएफ संस्थेचे विश्वस्त, राज्य सिंचन आयोगाचे सदस्य, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, कुलगुरू निवड समित्यांचे अध्यक्ष, नाबार्डचे संचालक म्हणून कामाचा ठसा उमटविलेल्या अण्णासाहेबांनी स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगला, तिथं मार्क्सवादाचा अभ्यास केला. नंतर पोटापाण्यासाठी वकिली सुरू केली.

१९६२ ला साडेबारा हजार रु. खर्चात ते लोकसभेवर निवडून गेले. १५ वर्षं दिल्लीत शेतीमंत्री असलेल्या, खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरायची नाही या तत्त्वाने वागणाऱ्या अण्णासाहेबांना दिल्लीतील खर्चासाठी श्रीरामपूरहून पैसे पाठवावे लागत असत. एवढ्यावरून त्यांच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाची कल्पना यावी.